गुजरातहून पुण्यात गुटख्याचा काळाबाजार! नऱ्हे पोलिसांचा मोठा धाडसी छापा; 22.91 लाखांचा प्रतिबंधित माल जप्त!

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत गुजरातमधून विक्रीसाठी आणण्यात आलेला तब्बल 22 लाख 91 हजार 534 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य माल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे आणि तपास पथकाने तात्काळ सापळा रचला.

नवले ब्रिज परिसरात संबंधित ट्रॅव्हल्स बस थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी बस चालक हबास मुबारक खान (वय 34, रा. बाडमेर, राजस्थान) याच्या ताब्यातून विमल पान मसाला, व्ही-1 तंबाखू, आरएमडी पान मसाला, तुळशी तंबाखू आणि गोवा गुटखा असा एकूण 5 लाख 90 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान हा माल घेण्यासाठी आलेल्या सोहेल अस्लम मुलाणी (वय 22, रा. गंजपेठ, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता केदारीनगर येथील एका गोदामात आणखी मोठा साठा असल्याची माहिती समोर आली.



पोलीसांनी गोदामावर छापा टाकला असता तेथून 17 लाख 734 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे दोन्ही ठिकाणांहून एकूण 22 लाख 91 हजार 534 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान हा माल अहमदाबाद (गुजरात) येथून खरेदी केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, किरण लिटे तसेच देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजू तोरे, नितीन वाघमारे आणि निलेश भोरडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

पुण्यात प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरोधात नऱ्हे पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठी मानली जात असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता सुरू आहे.

Black-market gutkha smuggled from Gujarat to Pune! Narhe police conduct a major, daring raid; banned goods worth ₹22.91 lakh seized.

महत्वाच्या बातम्या