विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली. Aaditya Thackeray
विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेले स्पष्टीकरण अमान्य करत आदित्य ठाकरेंनी थेट विधिमंडळ कामकाजावर बहिष्कार टाकत ‘वॉकआऊट’ (सभात्याग) केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन आदित्य ठाकरे यांना सुनावले.
आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत शिंदेंनी टोला लगावला, “ते आता सभागृहात नाहीत, नाहीतर मी त्यांना नक्की ऐकवले असते की, ‘कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!’”
कालच त्यांना एक ‘जोर का झटका धीरे से’ लागला आहे, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणूनच ते फ्रस्ट्रेट (निराश) होऊन डेस्परेटली अशी स्टंटबाजी करत आहेत, असा टाेलाही त्यांनी मारला.
मंत्र्यांच्या उत्तरांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी (सामूहिक जबाबदारी) आहे. राज्यमंत्र्यांना उत्तरे देताना जर काही अडचण आली, तर मी स्वतः तिथे हजर असतो. २०१९ ते २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) सभागृहात किती वेळ बसायचे आणि कोण उत्तरे द्यायचे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते,.
“तुम्ही पोरखेळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आणि जनतेचे प्रश्न मांडा, सरकार प्रत्येक प्रश्नाला खंबीरपणे उत्तर देईल. अडीच वर्षांत आम्ही ४५ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे, महायुती सरकार हे नेहमी जनतेच्या पाठीशी उभे आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “या मिंधे सरकारमध्ये नवीन प्रथा सुरू झाली आहे. जे उपमुख्यमंत्री आहेत, ते एवढे अकार्यक्षम आहेत की त्यांना बाहेर पैशांचे आणि रात्रीचे खेळ जमतात, पण सभागृहात बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळेच ते इतर मंत्र्यांना आपला कार्यभार वाटून देतात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दावा केला की २०१९ आणि २०२० मध्येही (महाविकास आघाडीच्या काळात) अशीच उत्तरे दिली गेली होती. मात्र, हे पूर्णपणे खोटे आहे. त्यावेळी कुणीही असा पळवाट काढला नव्हता, प्रत्येक मंत्र्याने पूर्ण जबाबदारीने प्रश्नांची उत्तरे दिली होती. अध्यक्षांनी खुर्चीवर बसून खोटे बोलू नये आणि आपले अगाध कायदेशीर ज्ञान पाजळू नये.”
सभागृहात याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात मोठी खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “अध्यक्षांनी २०१९ आणि २०२० चे रेकॉर्ड तपासावे. जर मंत्र्यांना उत्तरे देता येत नसतील, तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे.”
यावर संतापून शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले, “सभागृहाचे कस्टोडिअन अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नियमांनुसारच कामाचे वाटप केले आहे. २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहात किती उत्तरे दिली? तेव्हा तेही त्यांच्या मंत्र्यांना असे अधिकार देत होतेच. मग तुमच्या काळात जे चालले, ते आता का चालत नाही?”
You wasted your potential’: Eknath Shinde mocks Aaditya Thackeray
महत्वाच्या बातम्या