पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पोस्ट व्हायरल

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.Gunfire at Pune

मिळालेल्या माहितीनुसार, एच विकास स्टील (H Vikas Steel) या कंपनीच्या कार्यालयाला लक्ष्य करत अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यामध्ये या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.



व्हायरल पोस्टमध्ये अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचा उल्लेख करत, “आम्ही फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंपनीवर गोळीबार करण्यात आला,” असे म्हटले आहे. तसेच पुढे आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.

या पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोंकार आणि टायसन बिश्नोई यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि त्यामागे प्रत्यक्षात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. तसेच हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gunfire at Pune businessman’s office; viral post claims Lawrence Bishnoi gang involvement

महत्वाच्या बातम्या