पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट १५६ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले अमली पदार्थ भट्टीत जाळले

विशेष प्रतिनिधी

पुणे: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे अमली पदार्थ शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले. एकूण १५६ गुन्ह्यांशी संबंधित ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राउन शुगर आणि १०९ किलो डोडा यांची रांजणगाव एमआयडीसी येथील विशेष उच्च तापमानाच्या भट्टीत जाळून पूर्णपणे विल्हेवाट लावण्यात आली. Pimpri Chinchwad



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत अमली पदार्थ तस्करांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने न्यायालयीन आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अमली पदार्थ नष्ट करण्याचा निर्णय घेतला. या समितीत पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि पोलीस उपायुक्त (झोन-१) संदीप आटोले यांचाही समावेश होता.

ही कारवाई रांजणगाव येथील महाराष्ट्र एनवायरो पावर लिमिटेडच्या विशेष उच्च तापमानाच्या भट्टीत करण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व निर्धारित निकषांचे पालन करण्यात आले.

ही कारवाई अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शकूर तांबोळी तसेच पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मुले, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, संतोष स्वामी, रणधीर माने, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव, संतोष सपकाल आणि गोविंद डोके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Pimpri Chinchwad Police Destroy Drugs Worth 2.64 Crore

महत्वाच्या बातम्या