विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यावर भाजपा आमदार अमित साटम विधीमंडळ परिसरात हास्यविनोद करताना दिसले. त्यामुळे त्यांच्यावर विरोधक टीका करताना दिसत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अमित साटम यांच्यावर टीका केली. यानंतर अमित साटम यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र त्यांनी प्रत्युत्तर देताना मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे अमित साटम यांनी मुंबईतील विविध भागांचा दौरा करून प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित साटम म्हणाले की, विरोधक माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत. आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय.
विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले. पण पावसात कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरेंना मुंबईकरांनी रस्त्यावर पाहिले आहे का? मला टार्गेट करण्याचे कारण एकच, मुंबई महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीतलं 25 वर्षांचं ‘अंडरस्टँडिंग’ (भ्रष्टाचार) आणि मलिदा आम्ही कायमचा बंद केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अमित साटम यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच.
पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय? तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, यामुळे सगळे बेफाम झाले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
We Don’t Sit at Home and Write Social Media Posts, Amit Satam Hits Back at Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या