विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थी अनेक दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखेर आंदोलनस्थळी पोहोचले. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलन देशभर चर्चेत आल्यानंतर झालेल्या या भेटीमुळे पवारांचा पाठिंबा विद्यार्थ्यांसाठी होता की राजकीय वातावरणाचा फायदा घेण्यासाठी, असा सवाल उपस्थित झाला आहे.
पवार यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. दीपके यांनी विद्यार्थ्यांना मदत हवी आहे का, अशी विचारणा पवारांनी केल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी थेट मदत नाकारत आवश्यक बाबी अनिश यांना सांगितल्या जातील, असे स्पष्ट केले.
“आणखी किती दिवस आंदोलन करणार?” असा प्रश्न पवारांनी विचारल्यानंतर दीपके यांनी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१ कोटी मदत आणि सोनम वांगचुक यांची सुटका या मागण्या त्यांनी पवारांसमोर मांडल्या.
मात्र, विद्यार्थी अनेक दिवसांपासून उन्हा-पावसात आंदोलन करत असताना पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलनस्थळी आधी का पोहोचले नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनाला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळताच विरोधी पक्षांच्या नेत्यांची जंतर-मंतरवर वाढलेली गर्दी आता राजकीय श्रेयासाठीची स्पर्धा ठरत असल्याची टीका होत आहे.
शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत पोलिसांच्या कथित मारहाणीबाबत चिंता व्यक्त केली. जंतर-मंतरवरील आंदोलनाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांकडून घटनाक्रमाची माहिती घेतल्याचे वृत्तसंस्थांनीही नमूद केले आहे.
पवार यांनी सोशल मीडियावरील संदेशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी सरकारने त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा, अशी भूमिका मांडली. मात्र, केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या पवारांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस कृतीसाठी स्वतः कोणते राजकीय पाऊल उचलणार, हे स्पष्ट केलेले नाही.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे आणि पोलिसांसोबत झालेल्या संघर्षानंतर आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
दीपके यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या पाठीशी असल्याचा दावा केला. मात्र, नेत्यांचा पाठिंबा केवळ फोन, भेटी आणि सोशल मीडिया पोस्टपुरता मर्यादित राहणार की संसदेत आणि रस्त्यावर निर्णायक लढा उभारला जाणार, हा खरा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांच्या संतापाला राजकीय पाठिंबा देणे सोपे आहे. पण आंदोलन पहिल्या टप्प्यात सुरू असताना मौन राखणे आणि पोलीस कारवाईनंतर कॅमेऱ्यांसमोर सहानुभूती दाखवणे, ही भूमिका पवारांसारख्या अनुभवी नेत्याच्या राजकीय सोयीचीच असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
Sharad Pawar Wakes Up After Protest Goes National, Political Sympathy for Students?
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका