Dhananjay Deshmukh तपासासंदर्भात सर्व माहिती आम्हाला लेखी द्या, धनंजय देशमुख यांची पोलिसांवर शंका

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासावर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शंका घेतली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? असा सवाल करत तपासा संदर्भात सर्व माहिती आम्हाला लेखी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, मला पोलीस यंत्रणेवर शंका येत आहे. त्याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? माझ्या भावाचे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहेत. माध्यमांना हे व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने काय केले आहे. आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवे आहे .

देशमुख म्हणाले, यंत्रणेने आत्तापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे. याच बाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. जी घटना घडली त्यानंतर आरोपी जिल्ह्यात होते. सरेंडर होण्यासाठी ते जिल्ह्याच्या बाहेर गेले. याला सीआयडी, एसआयटी यंत्रणा जबाबदार असेल. या सर्वांची माहिती आम्हाला मिळालीच पाहिजे. याचे उत्तर लेखी स्वरूपात पाहिजे आहे. तोंडी घेणार नाही.

मला आता संशय येतोय आरोपींना फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांना कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी केला. या गोष्टीवर मला शंका आहे आणि त्याची माहिती मी घेणार आहे. जे समोर येत आहे त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही. कराड यांना कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचे आहे. आरोपींना अभय दिला नसता तर हा खून झाला नसता, असा आरोप देशमुख यांनी केला.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अद्यापही तापलेले आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरता कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात जे सांगितलं होतं, तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. आरोपी असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्राला यातून एक उदाहरण पाहायला मिळणार आहे, इथे गुन्हेगारांना माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, असे देशमुख यांनी त्यावेळी सांगितले होते.

Dhananjay Deshmukh doubts the police

महत्वाच्या बातम्या