विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे जाेसेफ यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवे सरकार स्थापन केले. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात झालेल्या या शपथविधी सोहळ्याने राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारमधील नऊ मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. मात्र या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव हाेते अवघ्या २९ वर्षीय एस. किर्तना.
शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या कीर्तनांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे त्या विजय सरकारमधील एकमेव महिला मंत्री आहेत. त्यांच्या निवडीमुळे महिला प्रतिनिधित्व, तरुण नेतृत्व आणि सामाजिक बदल याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “हे स्वप्नासारखे वाटत आहे. अशा प्रकारे सामान्य पार्श्वभूमीच्या व्यक्तींना संधी देणारे सरकार क्वचितच पाहायला मिळते. आम्ही प्रशासनात नवा आदर्श निर्माण करू. आम्ही काय करू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून देऊ,” असे त्या म्हणाल्या.
राजकारणात येण्यापूर्वी, त्या राजकीय सल्लागार आणि प्रचार रणनीतीकार म्हणून काम करत होत्या. त्यांनी तामिळनाडूचे दिग्गज नेते एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांसाठी धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले आहे.त्यांनी पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून गणित आणि सांख्यिकीमध्ये (Statistics) शिक्षण घेतले आहे.
शिवकाशी हा मतदारसंघ देशभरात ‘फटाक्यांची राजधानी’ म्हणून ओळखला जातो. फटाके उद्योग, मुद्रण व्यवसाय आणि लघुउद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात दशकानुदशके पारंपरिक राजकीय समीकरणे कायम होती. गेल्या जवळपास सात दशकांपासून या मतदारसंघात पुरुष नेत्यांचेच वर्चस्व होते. मात्र कीर्तनांनी ही परंपरा मोडीत काढत इतिहास रचला आहे. त्या शिवकाशीच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल ११ हजार ६९७ मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला.
कीर्तनांचे व्यक्तिमत्त्व अनेक कारणांनी चर्चेत आले आहे. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांना तमिळ, इंग्रजी आणि हिंदीसह अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. विशेषतः हिंदी भाषेवरील त्यांची पकड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरोधी भावना आणि भाषिक अस्मिता हा दीर्घकाळ संवेदनशील राजकीय मुद्दा राहिला आहे. अशा परिस्थितीत हिंदी भाषेत आत्मविश्वासाने संवाद साधणारी तरुण मंत्री म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. काहींनी त्यांचे कौतुक केले, तर काही राजकीय वर्तुळातून यावर चर्चा रंगली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, कीर्तनांची निवड ही विजय यांच्या नव्या राजकारणाची झलक मानली जात आहे. पारंपरिक राजकीय घराणी किंवा अनुभवी नेत्यांऐवजी तरुण, सुशिक्षित आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न टीव्हीकेकडून होत असल्याचे संकेत यामधून मिळत आहेत. विशेषतः महिला नेतृत्वाला चालना देण्याचा संदेशही यामागे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी शपथविधीनंतर केलेल्या भाषणात जनतेचे आभार मानले आणि आपल्या सरकारची दिशा स्पष्ट केली. “ही केवळ सरकार स्थापनेची घटना नाही, तर नव्या युगाची सुरुवात आहे. धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि विकास या तत्त्वांवर आमचे सरकार काम करेल,” असे त्यांनी सांगितले. स्वतःला “सामान्य माणूस” संबोधताना त्यांनी अवास्तव आश्वासने देणार नसल्याचे स्पष्ट केले. “मी फक्त तेच वचन देईन जे पूर्ण करू शकतो,” असे विजय म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विजय समर्थक चेन्नईत दाखल झाले होते. स्टेडियमबाहेरही चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी विजय यांच्या राजकीय प्रवासाची तुलना दक्षिण भारतातील पूर्वीच्या अभिनेता-राजकारण्यांशी केली. एमजीआर, जयललिता आणि एनटी रामाराव यांच्यानंतर तमिळ चित्रपटसृष्टीतून आलेल्या आणखी एका मोठ्या चेहऱ्याने सत्तेपर्यंत मजल मारल्याची चर्चा रंगली.
टीव्हीके मंत्रिमंडळात एन आनंद, आधव अर्जुना, केए सेंगोट्टैयन, पी वेंकटरामनन, आर निर्मलकुमार, राजमोहन, टीके प्रभू आणि केजी अनुराज यांचाही समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांचे अनेक दशकांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र विजय यांच्या टीव्हीकेने पहिल्याच मोठ्या राजकीय लढतीत सत्ता मिळवल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः युवक, महिला आणि शहरी मतदारांनी विजय यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे.
आता नव्या सरकारसमोर रोजगार, उद्योग, शिक्षण, सामाजिक न्याय आणि भाषा राजकारण यांसारखी मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत तरुण मंत्री एस. कीर्तनांसारखे नवे चेहरे प्रशासनात किती प्रभावी ठरतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Keerthana, 29, Becomes Tamil Nadu Minister
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा