विशेष प्रतिनिधी
पुणे:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाखो महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल २६ लाखांहून अधिक महिला लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला व बालविकास विभागाकडून या योजनेची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लाभार्थ्यांची माहिती, कागदपत्रांची सत्यता आणि आर्थिक पात्रता यांची बारकाईने तपासणी केली जात आहे. विभागाने यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देऊन लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही मोठ्या संख्येने महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास २६ लाख २४ हजार लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि तपशीलही सादर केलेले नाहीत. त्यामुळे पडताळणी प्रक्रियेत या महिलांची नावे अपात्रांच्या यादीत जाण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते की, योजनेंतर्गत पारदर्शकता राखण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच आर्थिक मदत मिळावी यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, उत्पन्नाचे तपशील, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि इतर निकषांची पडताळणी केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये चुकीची माहिती, अपूर्ण अर्ज, उत्पन्न मर्यादा ओलांडणे किंवा इतर योजनांचा लाभ घेत असल्यास अशा महिलांनाही अपात्र ठरवले जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी ई-केवायसीसाठी सेवा केंद्रांवर गर्दी केली असून, तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि प्रक्रियेबाबत स्पष्ट माहितीचा अभाव यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव आणि डिजिटल प्रक्रियेची मर्यादित माहिती यामुळेही अनेक महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही.
दरम्यान, विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. योजना जाहीर करताना मोठ्या प्रमाणावर प्रचार केला, मात्र पडताळणीच्या टप्प्यावर लाभार्थ्यांनाच अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे, सरकारने मात्र अपात्र लाभार्थ्यांची छाननी करणे आवश्यक असून, पात्र महिलांना योजनेंतर्गत लाभ सुरूच राहील, असा दावा केला आहे.
ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातून करण्यात आले आहे.
26 lakh ‘Ladki Bhaini’ ineligible due to lack of e-KYC? Verification in final stage, picture will be clear by the end of April
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल