पुण्याच्या प्रथम नागरिकांच्या अंगणातच वृक्षांची कत्तल; महापौर बंगल्यातील २० झाडांवर चालविली कुऱ्हाड!

विशेष प्रतिनिधी

पुणे: “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानीच महापौर बंगला येथे तब्बल २० झाडांची नियमबाह्य पद्धतीने तोडणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ धोकादायक फांद्या न छाटता अनेक वृक्ष अर्ध्यापर्यंत कापण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. Mayor’s Bungalow

नेमकी घटना काय?

घोले रस्त्यावर पुणे महानगरपालिकेच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान आहे. या बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत यातील २० झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी करण्यात आली. प्रशासनाकडून झाडांना ‘कीड’ लागल्याचे कारण पुढे करण्यात आले असले, तरी ज्या पद्धतीने ही झाडे तोडण्यात आली आहेत, त्यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियमानुसार, एखादे झाड धोकादायक असल्यास केवळ त्याच्या फांद्या ठराविक आकारात कापल्या जाणे अपेक्षित असते, मात्र येथे अनेक झाडे निम्मी कापली गेली आहेत.



प्रशासकीय संभ्रम आणि मंजुरीचा खेळ

वृक्ष संवर्धन नियमांनुसार, झाड कापण्यापूर्वी त्याचे छायाचित्र, वृत्तपत्रात नोटीस आणि रीतसर पंचनामा होणे आवश्यक असते. या प्रकरणात १२ मार्च वृक्ष संवर्धन विभागाचे रवींद्र कांबळे यांनी १९ वृक्षांच्या फांद्या छाटण्याचा प्रस्ताव दिला.१३ मार्च अवघ्या २४ तासांत सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांनी याला मंजुरी दिली.विशेष म्हणजे, सहायक आयुक्तांनी या प्रकरणावर बोलताना “दररोज अनेक अर्ज येतात, नेमकी माहिती घेऊन सांगतो” अशी संदिग्ध भूमिका घेतल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महापौरांचे स्पष्टीकरण

या वादावर नवनियुक्त महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्पष्ट केले की, त्या निवासासाठी जाण्यापूर्वीच ही झाडे तोडण्याचे काम सुरू होते. “मी विचारणा केली असता प्रशासनाने रीतसर परवानगी असल्याचे सांगितले. झाडांवर उपचार करण्यासाठी आणि ती खराब झाल्यामुळे ही छाटणी केली जात असल्याची माहिती मला देण्यात आली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी पालिकेचे कोट्यवधींचे बजेट असताना, दुसरीकडे महापौरांच्या बंगल्यातच अशी वृक्षतोड होत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ उपचारांचे नाव देऊन हिरव्यागार झाडांचा बळी दिला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Axing of Trees in the Backyard of Pune’s First Citizen; 20 Trees Cut at Mayor’s Bungalow

महत्वाच्या बातम्या