समीर वानखेडेंच्या याचिकेवर केंद्र सरकारकडून सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर, 28 एप्रिलला होणार सुनावणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर उत्तर देत अखेर केंद्र सरकारच्या वतीनं मंगळवारी हायकोर्टात आपला सीलबंद अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाची नोंद घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं या याचिकेवर 28 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केले आहे. तसेच हायकोर्टात इतकी वर्ष एखादं प्रकरण केवळ तांत्रिक मुद्द्यावर न्यायप्रविष्ट ठेवणं हे योग्य नसल्याचंही हायकोर्टानं नमूद केले आहे. Sameer Wankhede

2021 मधील कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणातून अभिनेता शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे. त्याप्रकरणात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

एनसीबीचे विभागीय प्रमुख असताना समीर वानखेडे यांनी 2021 मध्ये कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली होती. या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक झाली होती. याप्रकरणात आर्यनला वाचवण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर असून, सीबीआयनं याप्रकरणी समीर वानखेडेंविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली. गेली दोन वर्षे हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. अॅडिशनल सॉलिसिटर जनरल यांना वेळ नसल्याचं सांगत सीबीआय वारंवार सुनावणी तहकूब करण्याची विनंती करत आली. याचा परिणाम वानखेडे यांच्या बढतीवर होत आहे, असा युक्तिवाद त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी हायकोर्टात केला.



समीर वानखेडेंनी मात्र त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या विभागीय संचालकपदी असाताना आपण बॉलिवूड आणि अंमली पदार्थांचं एक मोठं कनेक्शन उघडकीस आणलं होतं. त्यावेळी अनेकांची चौकशी झाली होती, काहींकडे अंमली पदार्थ सापडलेही होती. त्याचकाळात मुंबईहून गोव्याला जाणाऱया एका क्रुझवर टाकलेल्या धाडीत आर्यन खानला अटक केल्याबद्दल आपल्याला खोट्या आरोपांत गोवण्यात आलं. आर्यनला वाचवण्यासाठी त्याचे वडील शाहरूख खानकडे आपण 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला. पुढे तडजोड करत ही रक्कम 18 कोटींवर ठरवून त्यातील 50 लाखांचा पहिला टप्पा स्वीकारल्याचाही आरोप करण्यात आला होता. मात्र, मुळात आपण शाहरूखनशी कोणताही संपर्क साधलेला नाही. माझं नाव वापरून जर कोणी ही कृत्य केली असतील तर त्याला आपण जबाबदार नाही, असा दावा समीर वानखेडे यांच्या वतीनं त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी हायकोर्टात केला.

आपण निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे तपास केला असून, आपल्यावर विविध कारणांनी दबाब टाकण्यात येत होता. आपल्याला एका राजकीय व्यक्तीकडून सतत लक्ष करण्यात आलं. आजपर्यंतच्या सेवेत आपण कधीही चुकीचं वागलेलो नाही. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, आपण कोणत्याही चौकशीला समोरं जायला तयार आहोत. तसेच आपल्या कुटुंबीयांवर सतत आरोप केले गेले. माझे काही खासगी फोटो लिक करण्यात आले. हे सर्व आरोप संपूर्णतः खोटे, दिशाभूल करणारे असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं. एनसीबीसारख्या स्वतंत्र तपास यंत्रणेची प्रतिमा मलीन करण्यासाठी आरोप केले असल्याचं एनसीबीच्या वतीनं त्यावेळी प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून या प्रकरणातील तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांचे सेवेतील रेकॉर्ड हे स्वच्छ प्रतिमेचे असून, ते प्रामाणिकपणे आणि सचोटीनं मुंबई शहर ड्रग्समुक्त बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यावेळी एनसीबीकडून सांगण्यात आलं होतं.

Centre submits sealed report in Sameer Wankhede plea, hearing on april 28

महत्वाच्या बातम्या