विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेचा तपास ‘गुन्हे अन्वेषण विभाग’ अत्यंत सखोल आणि सर्व बाजूंनी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा अपघात होता की घातपात? यात कोणतीही फौजदारी कट-कारस्थाने किंवा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (२९ मे) गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाषाण येथील मुख्यालयाला भेट देऊन या तपासा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सीआयडीने हे स्पष्टीकरण दिले आहे.
सीआयडीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने काही गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी उपस्थित केलेले हे सर्व नवीन मुद्दे यापुढील तपासामध्ये अंतर्भुत (समाविष्ट) करण्यात येतील.
सीआयडीने पुढे म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी देखील वेळोवेळी या प्रकरणाशी संबंधित विविध मुद्दे मांडले होते, ज्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वीच तपास केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि योग्य गतीने सुरू असल्याचे सीआयडीने सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाने या तपासाची व्याप्ती आणि मुख्य उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, या अपघातामागे कोणताही पूर्वनियोजित कट रचण्यात आला होता का?, विमानाची देखभाल किंवा उड्डाणादरम्यान मानवी चूक वा निष्काळजीपणा झाला का?, कायद्याने किंवा नियमाने बंधनकारक असलेली कृती संबंधित यंत्रणांकडून जाणीवपूर्वक टाळली गेली का?, विमानाशी किंवा यंत्रणेशी जाणीवपूर्वक छेडछाड करून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला का? या बाबींची पडताळणी करण्यासाठी तपास केला जात आहे.
या तपासाला तांत्रिक आणि कायदेशीर बळ मिळण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग देशातील आणि राज्यातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या विमान अपघात तपास ब्युरो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, फॉरेन्सिक सायन्स लॅब या सर्व नामांकित संस्थांशी सीआयडी समन्वय साधून आहे. अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट करणाऱ्या न्यायवैद्यकीय आणि तांत्रिक अहवालांचा वेगाने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले.
CID probes Ajit Pawar aircraft incident for possible sabotage and negligence, clarifies agency
महत्वाच्या बातम्या