विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी देण्यात आलेली मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
यापूर्वी HSRP बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यभरात सुरू असलेल्या HSRP बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार १ जुलै २०२६ पासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या जुन्या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील जुन्या वाहनांनाही या सुरक्षा प्रणालीअंतर्गत आणण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि आगाऊ वेळ निश्चित करून ३० जून २०२६ पूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी.”
दरम्यान, वाहनधारकांनी कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे. HSRP नोंदणी आणि फिटमेंटसाठी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.