विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पूर्व मोसमी पावसाचा प्रभाव कमी होताच उष्णतेची मोठी लाट आली असून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्र चांगलाच होरपळून निघाला आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 40 अंश सेल्सिअसच्या पलिकडे पोहोचला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. तसेच, पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अशीच उष्णतेची लाट पाहायला मिळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारी (27 एप्रिल) राज्यातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, बुलढाणा, नागपूर, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची तसेच उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी (26 एप्रिल) अकोल्यामध्ये या मोसमातील रेकॉर्डब्रेक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या दोन्ही विभागासह पश्चिम, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच होता.
भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णतेच्या लाटेचा हायअलर्ट जारी केला होता. उन्हाच्या कडाक्याचा दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अकोल्यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उकाडा आणि आर्द्रतेमुळे रविवारी मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही झाली. रविवारी कुलाब्यात 34.4 अंश सेल्सिअस व सांताक्रूझमध्ये 33.8अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे तापमान कमी असले, तरी घामांच्या धारांनी मुंबईकरांचे हाल झाले.
Heatwave sweeps the state, temperatures cross 40°c in several districts
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल