धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : आपण ज्या राज्यात राहताे त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे. धर्माच्या भावनेने बघू नका. तुम्हाला मराठी आलीच पाहिजे असे आवाहन माजी खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येणे आवश्यक आहे, या नियमाची १ मे या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यांना प्रशिक्षण देण्याचीही सरकारची तयारी आहे. त्यामागे त्यांनी मराठी बीएची पदवी घ्यावी, त्यासाठी परीक्षा द्यावी अशी अपेक्षा नाही, तर त्यांना जुजबी मराठी बोलता यायला हवे आणि रोजच्या व्यवहारातील मराठी बोलणे जमले पाहिजे ही भूमिका आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.



इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही मराठीचे समर्थनच करतो. ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. मी खास करून मुस्लिमांना गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमचा मुलगा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असेल आणि त्यानंतर त्याला सरकारी नोकरी हवी असेल, तर त्यासाठी त्यांनी मराठी शिकून घेतलीच पाहिजे. कारण अशा ठिकाणी मराठीचे ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे या गोष्टीकडे कुठल्याही जाती किंवा धर्माच्या नजरेतून पाहू नये. पण जर सरकार असे म्हणत असेल की तुम्ही आठ दिवसांत मराठी बोलायला शिका अन्यथा नवव्या दिवशी तुमच्यावर कारवाई केली जाईल किंवा गुंडगिरी केली जाईल, तर मात्र ते योग्य ठरणार नाही

दरम्यान, प्रताप सरनाईक यांना वारंवार असाही प्रश्न विचारला जात आहे की, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता येण्याच्या नियमाची निकड आत्ताच का भासली? त्यावरही सरकारकडून त्यांनी उत्तर दिले आहे. “हा नियम प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाही, तो १९८९चा नियम आहे. अनेक रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते अरेरावी करतात. प्रवासी मराठीत बोलत असूनही ते हिंदीतच बोला असे सांगतात. त्यातून भाषावाद निर्माण होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना बॅज देताना जुजबी मराठी बोलता यायलाच हवी,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Imtiaz Jalil’s appeal to the Muslim community

महत्वाच्या बातम्या