कट्टर विराेधकांची गळाभेट, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तार- दानवेंच्या भेटीने राजकीय चर्चा सुरू

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात छत्रपती संभाजी नगरमध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यात आज समृद्धी महामार्गावर थेट गळाभेट झाली. Sattar-Danve

साेमवारी या दोन्ही नेत्यांनी ‘दोन्ही शिवसेना वैभवासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी पुन्हा एकत्र आल्या पाहिजेत’, असे जाहीर वक्तव्य केले होते. अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बोलविल्याने समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अंबादास दानवे हे शिर्डीच्या दिशेने जात होते. याच प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावरील एका टप्प्यावर दोन्ही नेत्यांच्या गाड्या समोरासमोर आल्या. दोन्ही नेत्यांनी गाड्या थांबवून एकमेकांची विचारपूस केली आणि अत्यंत हसऱ्या वातावरणात गळाभेट घेतली.



मराठवाड्याच्या राजकारणात आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, कालच दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे बोलताना दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. ‘शिवसेना फुटल्याने नुकसान झाले असून, जर दोन्ही गट एकत्र आले तर पुन्हा एकदा मोठी ताकद निर्माण होईल’, असे मत व्यकत केले हाेते.

अब्दुल सत्तार यांनी मित्रपक्ष भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेचे हात-पाय तोडले; पण आमचे तर मुंडकंच तोडले आहे, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले होते. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेना आणि भाजपात धुसफूस सुरू आहे . छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून सत्तार यांच्या मुलानेही बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे शिंदेसेनेत नाराजी असल्याचे समोर आले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले पाहिजे असे अंबादास दानवे यांना वाटते, तुम्हालाही वाटते का? या प्रश्नावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, “आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आपल्याला एकत्र यायचे आहे, तर त्याबद्दल कोणाला विचारण्याची गरजच नाही. माझा नेता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.

Political discussions begin with Sattar-Danve meeting in the backdrop of Legislative Council elections

महत्वाच्या बातम्या