विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tukaram Mundhe अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग कारवाया करून निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अन्न सुरक्षेबाबत प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.Tukaram Mundhe
तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी, २६ मे रोजी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे मोठी कारवाई करण्यात आली. येथे आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. या कारवाईत सुमारे २० हजार रुपये किमतीचे ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले.Tukaram Mundhe
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवण्याऐवजी घातक रसायनांचा वापर करून ते बाजारात विक्रीसाठी आणले जात होते. अशा रसायनांचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा फळांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त केले. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ४० हजार ९६० रुपये किमतीचे तूप जप्त करण्यात आले. तपासणीदरम्यान तुपाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. ग्राहकांची दिशाभूल करून अशा उत्पादनांची विक्री केली जात असल्याचेही समोर आले आहे.
बुधवारी, २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आणखी एक धडक कारवाई करण्यात आली. येथे निकृष्ट दर्जाचा २१५ किलो खवा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ४७ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक तपासात हा खवा आरोग्यास अपायकारक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
सलग कारवायांमुळे राज्यभरातील भेसळखोर आणि निकृष्ट अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांमध्ये भेसळ होण्याच्या तक्रारी वाढतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “निकृष्ट, भेसळयुक्त आणि आरोग्याला अपायकारक अन्नपदार्थांची विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे अशी मोहीम पुढेही सुरूच राहणार आहे.”
विभागाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद अन्नपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ किंवा फळांविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
FDA crackdown intensifies under Tukaram Mundhe; action against food adulteration across Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश