मुंबई : FDA राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भ्रामक औषधविक्री आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी मोहीम हाती घेतली असून राज्यभरातील सात जिल्ह्यांमधील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा आक्षेपार्ह आणि मिसब्रँडेड औषधसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.FDA
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तसेच अवैध औषध उत्पादन आणि वितरण करणाऱ्या साखळीविरोधात अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल.FDA
मुंढे म्हणाले की, ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ तसेच इतर संबंधित कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. सुरक्षित अन्न आणि दर्जेदार औषधे मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या उद्दिष्टासाठी एफडीए कटिबद्ध असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर पावले उचलली जातील.
अनेक औषध उत्पादक आणि विक्रेते विविध माध्यमांतून चमत्कारिक परिणामांचे दावे करणाऱ्या जाहिराती प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जाहिरातींमुळे नागरिकांची दिशाभूल होऊन ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करतात. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःहून औषधोपचार करण्याचे टाळावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
नागरिकांसाठी नवीन मोबाईल अॅप आणि टोल-फ्री सेवा
तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एफडीएकडून लवकरच विशेष मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांसाठी टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास, अवैध साठवणूक अथवा संशयास्पद विक्रीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने एफडीएकडे तक्रार दाखल करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
तक्रार करताना तक्रारदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संशयित औषधाचे नाव नमूद करणे आवश्यक राहणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची गोपनीयतेने पडताळणी करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहआयुक्त (औषधे) गणेश रोकडे यांनी दिली.
सात विभागांत विशेष मोहीम
राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना विशेष तपास मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सात विभागांमध्ये व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने साठवलेली औषधे, चुकीच्या लेबलिंगची उत्पादने तसेच आक्षेपार्ह जाहिरातींशी संबंधित साहित्य आढळून आले.
एफडीएच्या या कारवाईमुळे राज्यभरातील औषध विक्रेते आणि उत्पादकांमध्ये खळबळ उडाली असून येत्या काळात अशा प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, आरोग्याशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.
७ जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली.७३.२४ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त केला. भ्रामक जाहिराती आणि मिसब्रँडेड औषधांवर कारवाई
FDA cracks down on misleading medicines; stock worth ₹73 lakh seized
महत्वाच्या बातम्या