विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maratha Reservation मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या पात्र वारसांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) सामान्य प्रशासन विभागाने जारी केला असून, त्यामुळे बाधित कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Maratha Reservation
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. यापूर्वी राज्य सरकारने अशा वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (ST) नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची व्याप्ती वाढवून MIDC मध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.Maratha Reservation
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने अल्पावधीतच शासन निर्णय जारी करून मागणीची पूर्तता केली आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांची सखोल पडताळणी करून पात्रता निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पडताळणीनंतर पात्र वारसांना जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तींना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः एसटी महामंडळातील नोकरी स्वीकारण्यास इच्छुक नसलेल्या काही वारसांसाठी एमआयडीसी हा पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठा समाजातील विविध संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारची ही कार्यवाही महत्त्वपूर्ण मानली जात असून, यामुळे प्रभावित कुटुंबांना स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.
Government Approves Compassionate Jobs in MIDC for Heirs of Deceased Maratha Reservation Agitators
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन