विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखो रुपयांना ‘नीट’चा पेपर विकला गेला आणि त्याची मुळे महाराष्ट्रात सापडत असताना केंद्र सरकार केवळ परीक्षा रद्द करून आणि सीबीआय चौकशी जाहीर करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे तब्बल २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य अधांतरी राहिल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘नीट’ परीक्षा सुरू झाल्यापासूनच त्यांनी या व्यवस्थेला विरोध केला होता. २०१६ मध्ये देशभर एकच वैद्यकीय प्रवेश परीक्षा लागू करण्यामागे केंद्र सरकारचा केंद्रीकरणाचा हट्ट होता. या पद्धतीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसचा फायदा होईल, तर ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भीती आपण आधीच व्यक्त केली होती. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या कोचिंग उद्योगांकडे आर्थिक ताकद असून व्यवस्था वाकवण्याची क्षमता असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठी असताना, उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना या राज्यांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीच ‘नीट’सारखी परीक्षा लादण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. तामिळनाडूसह दक्षिणेकडील अनेक राज्यांनी ‘नीट’ला विरोध केल्याचे सांगत
काही विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळणे, ग्रेस मार्क्स देण्याचे प्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षेची विश्वासार्हता संपल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. “ज्याच्याकडे व्यवस्था वाकवण्याची ताकद आहे, त्यालाच या व्यवस्थेत फायदा मिळतो,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अशा प्रक्रियेतून वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांवर समाजाने विश्वास ठेवायचा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही त्यांनी टीका केली. त्यांच्या कार्यकाळात ‘नीट’ संदर्भातील अनेक वाद आणि गोंधळ झाले, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “२२ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा,” अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
राज्य सरकारलाही फटकारले
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारलाही थेट सवाल केला. “महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच संधी मिळणार नसेल, तर सरकारचा उपयोग काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी ठाम भूमिका घ्या, असे आवाहन त्यांनी राज्यातील मंत्र्यांना केले.
पेट्रोल-डिझेल बचतीचे फोटोसेशन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवा, असा टोला लगावत महाराष्ट्राने दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे ‘नीट’विरोधात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.