RTE admission : आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

विशेष प्रतिनिधी

पुणे : RTE admission शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या एका पित्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.RTE admission

ज्ञानेश्वर उर्फ माउली गंगाराम जगताप (वय ३७, रा. चिंचवड नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आकुर्डी येथील फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत करण्यात आली.RTE admission



या प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च २०२६ रोजी ऑनलाईन अर्ज भरला होता. २७ एप्रिल रोजी ते अर्जाच्या पडताळणीसाठी आकुर्डी येथील पडताळणी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांचा अर्ज रिजेक्ट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांची भेट आरोपी माउली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदाराच्या मुलीच्या अर्जाची पडताळणी करून प्रवेशाची पावती मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने २९ एप्रिल रोजी पुणे एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर, आज ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना माउली जगताप याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, असावरी शेंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय अधिकाऱ्याच्या नावाने खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे. त्यासाठी रहिवासी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.

Bribe of ₹40,000 demanded for RTE admission, shocking incident in Pimpri-Chinchwad

महत्वाच्या बातम्या