पुण्यातील प्रदूषणावर MPCBचा दंडुका; गृहनिर्माण संस्थांवर कारवाईचा इशारा, महापालिकेलाही नोटीस

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर भूमिका घेतली असून, सांडपाणी प्रक्रिया न करता ते थेट बाहेर सोडणाऱ्या आणि कचरा विलगीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी स्पष्ट सांगितले की, पर्यावरणीय नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची तपासणी सुरू असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
शहरातील अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न ठेवता प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट बाहेर सोडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचबरोबर, कचरा व्यवस्थापनाच्या नियमांनुसार ओला-सुका कचरा विलगीकरण केले जात नसल्याने प्रदूषणात मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील गृहनिर्माण संस्थांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रक्रियेची व्यापक तपासणी सुरू केली आहे.



याबाबत बोलताना सिद्धेश कदम म्हणाले की, पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने स्वतःची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ उभारणे पुरेसे नसून तो नियमित आणि कार्यक्षमपणे चालविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच कचरा विलगीकरणाची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात शहराच्या पर्यावरणीय आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

दरम्यान, पुण्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुळा-मुठा नदी परिसरातील एका टप्प्याचे तांत्रिक सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका आणि जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून नदीप्रदूषणाची नेमकी कारणे, सांडपाण्याचे स्रोत आणि त्यावर उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.

MPCB’s baton on pollution in Pune; Warning of action against housing societies, notice to Municipal Corporation also

महत्वाच्या बातम्या