विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे उघडकीस आलेल्या गंभीर स्वच्छता गैरव्यवस्थापन प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून संबंधित कंत्राटी संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच त्या संस्थेला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनोरुग्णालयात अस्वच्छता, घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य असल्याचे तसेच रुग्णांकडूनच स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकरणी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले की, रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. मात्र, त्या संस्थेकडून करारातील अटींचे पालन करण्यात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. रुग्णालय परिसरात योग्य स्वच्छता राखली गेली नाही, तसेच काही ठिकाणी रुग्णांकडूनच स्वच्छतेची कामे करून घेतल्याचेही समोर आले आहे, जे अत्यंत गंभीर व अमानवीय प्रकार मानला जात आहे.
डॉ. कोलोड यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून प्राथमिक अहवालात संबंधित संस्थेची निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे त्या संस्थेला तातडीने ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. याशिवाय संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य स्तरावरून स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचारांसोबत स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळणे अत्यावश्यक असताना अशा प्रकारच्या घटना समोर येणे ही चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून रुग्णालय परिसरात स्वच्छतेसाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. तसेच, पुढील काळात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर देखरेख आणि नियमित तपासण्या करण्यात येणार असल्याचेही अधीक्षकांनी सांगितले.