अध्यक्षपदाची गाडी नाकारून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी; पुण्यातील नगरसेवकाचा महाराष्ट्रासमोर आदर्श…

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेत विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक २५, शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई परिसराचे प्रतिनिधित्व करणारे मानकर यांच्या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपद स्वीकारताच त्यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडीनंतर पदभार स्वीकारताना बाप्पू मानकर यांनी प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी नाकारण्याचा निर्णय घेतला. या गाडीवर होणारा खर्च वाचवून तो निधी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात यावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या कररूपी पैशांचा वापर अधिक लोकहितासाठी व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



पुणे महापालिकेच्या एकूण १५ प्रभाग समित्यांसाठी आज अध्यक्षपदांच्या निवडणुका पार पडल्या. या प्रक्रियेत अनेक ठिकाणी राजकीय चुरस पाहायला मिळाली असली, तरी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीत मात्र एकमताने मानकर यांची निवड झाली. यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या कामकाजावर असलेला विश्वास अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना मानकर यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ते म्हणाले,“प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, तसेच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले. तसेच, जनतेशी थेट संवाद ठेवून त्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शासकीय गाडी नाकारण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सध्याच्या काळात सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी सुविधा नाकारून लोकहिताला प्राधान्य देण्याची उदाहरणे विरळा असल्याने, मानकर यांच्या या निर्णयाकडे ‘आदर्श नेतृत्वा’चे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

Rejecting the presidential car, funds for students’ education; Pune corporator sets a model for Maharashtra…