अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यात निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय व आदिवासी कल्याण विभागाच्या निधीमध्ये झालेल्या बदलांमुळे शिंदे गटात नाराजीचा सूर उमटला होता. विशेषतः मंत्री शिरसाट यांनी माध्यमांपुढे अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनीही अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटले होते की, “अजित पवार आपल्या खिशातून पैसे देतो का? पण काहीजण अजित पवार पैसे देत नाहीत अशा बातम्या पसरवतात.” यामुळे या वादाला अधिक उधाण आले होते.मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांची भेट घेतली आणि त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी प्रतिक्रिया मंत्री शिरसाट यांनी दिली.



“अजित पवारांसोबत आमची मोकळ्या मनाने चर्चा झाली. ते सभेत मिश्कीलपणे बोलले असावेत. आता आमच्यात कोणताही वाद राहिलेला नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी महायुतीतील एकजूट कायम असल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत विचारले असता सांगितले की, “महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची मानसिकता आहे, अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील.”

शिरसाट यांनी स्पष्ट केले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. “कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकासकामाच्या भूमिपूजनाबाबत चर्चा झाली होती,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे संकेत दिले आहेत . यावर शिरसाट म्हणाले“जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात नाराज आहेत. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना डावलले जात असावे. त्यांचे मन तिथे रमत नाही ही वस्तुस्थिती आहे.”

 

Ajit Pawar and Sanjay Shirsat reconcile; Dispute over fund allocation resolved

 

महत्वाच्या बातम्या