राजकारणामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा, पतीच्या बंडखोरीमुळे माजी महापौर माहेरी

विशेष प्रतिनिधी

नागपूर : राजकारणामुळे कुटुंबात दुरावा आल्याचे अनेक प्रकार पाहतो. भाऊ – भाऊ, भाऊ – बहीण आणि काका – पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले. पण राजकारणामुळे पती – पत्नीच्या नात्यात दुरावा आल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. Former Mayor

भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कुटुंबात राजकारणामुळे थेट पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत वॉर्ड क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे अर्चना डेहनकर यांना मोठ्या मानसिक कोंडीत सापडावे लागले असून, त्यांनी काही दिवसांसाठी माहेरी जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.



अर्चना डेहनकर यांनी 2009 ते 2012 या काळात भाजपकडून नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे पक्षाविरोधात जाणे हे त्यांच्या भूमिकेला मान्य नसल्याचे सांगितले जाते. एका बाजूला पक्षाशी असलेली निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला पतीचा राजकीय निर्णय, या संघर्षात त्यांनी तात्पुरता दुरावा स्वीकारल्याचे बोलले जात आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना विनायक डेहनकर यांनी पत्नी माहेरी गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यात कोणताही कौटुंबिक वाद नसून, निवडणुकीच्या काळात घरात परस्परविरोधी राजकीय भूमिका नको म्हणूनच आपणच पत्नीला 8-10 दिवसांसाठी माहेरी पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“ती माहेरी गेली आहे, पण यात माझी काहीच चूक नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी वादाला राजकीय चौकटीतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला.

राजकीय मतभेदांमुळे पती-पत्नीमध्ये असा दुरावा निर्माण झाल्याची घटना नागपूरच्या राजकारणात दुर्मिळ मानली जात असून, शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीतील उमेदवारीचे राजकारण किती तीव्र पातळीवर पोहोचले आहे, याचे हे एक जिवंत उदाहरण असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Politics Drives Wedge Between Couple, Former Mayor Moves to Parental Home After Husband’s Rebellion

महत्वाच्या बातम्या