पुणे महापालिकेचा महापौर बनवताना शिवसेनेला विचारात घ्यावेच लागेल, उदय सामंत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे महापालिकेचा महापौर बनवताना शिवसेनेला विचारात घ्यावेच लागेल, असा दावा उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले. पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती निलम गोरे, आमदार विजय शिवतरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सामंत म्हणाले, पुण्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच शिवसेना १२० जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेनेला कोणीही कमी लेखू नये. शिवसेना एकच्या पन्नास जागा कशा निवडून आणते, हे येत्या १६ तारखेलाच स्पष्ट होईल. शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत, अशी टीका काही जण करत होते; मात्र एक दिवस जास्त मिळाला असता तर १६५ उमेदवार उभे केले असते, असेही त्यांनी सांगितले.

प्रचाराबाबत मार्गदर्शन करताना सामंत म्हणाले की, तेरा दिवसांत समोरच्याचा ‘तेरावा’ घालायचा आहे, अशा पद्धतीने प्रचार करा. आज संपूर्ण शहरात भगवे वातावरण आहे. कसबा गणपती, दगडूशेठ गणपती शिवसेनेवर संकट येऊ देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रवींद्र धंगेकर यांच्यासोबत जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी, आजपासूनच प्रचाराला लागा, असा संदेश दिला. नवीन उमेदवारांच्या मागे धनुष्यबाण असेल, तर जनता आपोआप त्यांच्या मागे उभी राहते, असे ते म्हणाले. पुण्यात मी स्वतः राहिलेलो असल्याने पुणेकरांना काय हवे आहे, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे आणि तेच आम्ही देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चांदणी चौक आणि नवले पूल येथील वाहतूक कोंडी व इतर समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पुण्यात पाठवले होते, असे सांगत सामंत म्हणाले की, विकासाची कामे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात. वाहतुकीचा प्रश्न, कात्रजचा विकास आराखडा तसेच उपनगरांतील गावांच्या समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे.

रात्री अकरा वाजता प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम ठरवूनही हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, याकडे लक्ष वेधत सामंत म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे, खरी ‘पिक्चर’ तुम्हाला १६ तारखेलाच पाहायला मिळेल.



ही लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती

ही लढाई शिवशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे उदय सामंत म्हणाले. मात्र धनशक्तीमध्ये कोण कोण आहेत, हे सांगण्याची पुणेकरांना गरज नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.

महायुतीत खडा पडेल अशी कोणतीही वागणूक होता कामा नये, असा सल्ला उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिला. एका जागेच्या पन्नास जागा कशा करायच्या, हे शिवसैनिकांना चांगले माहिती आहे, असेही ते म्हणाले.

आपल्याला कोणावरही टीका करण्याची गरज नाही. आपण फक्त विकासाबद्दल बोलायचे. टीका करण्याचे काम अजितदादा करत आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

शेवटपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होतो. युती तुटली आहे, असे मी म्हणत नाही. त्यांना जे वाटले ते त्यांनी केले; मात्र शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय पुण्याचा महापौर करता येणार नाही, असे सामंत म्हणाले.

इतर लोक पत्रकार परिषदांमध्ये व्यस्त असतील, आपण मात्र विकासाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा, असा संदेश सामंत यांनी दिला.

पिंपरी-चिंचवडमधील काही शासकीय कर रद्द करण्यात आले असून त्याचे श्रेय कोणी घेत असले, तरी प्रभारी नगरविकास मंत्री म्हणून हे काम मीच केले आहे. त्यामुळे याचे श्रेय घेण्याची गरज कोणालाही नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

The Shiv Sena will have to be consulted when electing the mayor of the Pune Municipal Corporation.

महत्वाच्या बातम्या