बारामतीत बिनविरोध निवडणुकीला काँग्रेसचा खो , सुनेत्रा पवारांविरोधात मैदानात उतरणार

विशेष प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. काँग्रेस पक्षाने बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून, या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी मंजुरी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल.



काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. उमेदवार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आज दिवसभरात ती पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उद्या माध्यमांसमोर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले आहे.

बारामती आणि राहुरी या मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्या यापूर्वी राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला असून, आता त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्या बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार यांच्या गटाने लढवल्या होत्या. बारामतीत सुनेत्रा पवार उमेदवारी करत असल्याने शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेसने दोन्ही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या गटाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Congress Upsets Unopposed Plan in Baramati, Set to Contest Against Sunetra Pawar

महत्वाच्या बातम्या