विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे चर्चेला उधाण आले आहे.पुण्यात देखील माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटातील इच्छुकांनी मुंबईच्या वाऱ्या करण्यास सुरुवात केली आहे. संख्याबळानुसार भाजपाला ५ जागा मिळणार आहेत,मात्र पुण्यातून कुणाची वर्णी लागणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुण्याला एक जागा मिळणार हे निश्चित झाले असेल तरी,उमेदवार पुणे शहरातला की ग्रामीण भागातला असावा,यावरून सध्या पुणे भाजपात पेच असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातून कुणाच नाव पुढे..
पुणे शहरातून भाजपाच्या उमेदवारीसाठी दोन मोठी नाव चर्चेत आहेत.यातलं पहिलं नाव म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांचं आहे.मागील अनेक वर्षांपासून संघटनेत सक्रिय असणाऱ्या राजेश पांडेंना भाजपकडून आत्तापर्यंत नेहमीच न्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्यातून विधान परिषदेसाठी राजेश पांडे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.तर दुसरीकडे, वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील स्पर्धेत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदीश मुळीक यांना दिलेला शब्द ते पाळतील,अशी चर्चा सध्या पुणे भाजपात ऐकायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी?
दरम्यान,पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागात ताकद वाढवण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी वेगळा विचार करू शकतात.पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना संधी देऊन पुण्याच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा पकड मिळण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो.तर दुसरीकडे,भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा विधान परिषदेच्या आमदारकीसाठी ऐकायला मिळत आहे.
सध्या पुणे शहरात भाजपाची असलेली पकड लक्षात घेता,ग्रामीण भागात अधिक ताकद लावणे गरजेचे असल्याचे पक्षांतर्गत बैठकांमध्ये बोलले जात असल्याचे कळत आहे. 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 23 एप्रिल पासून अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे मुखमंत्री दिलेला शब्द पाळून जगदीश मुळीक यांना पुन्हा एकदा संधी देणार, शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राजेश पांडे यांच्या नावाचा विचार केला जातो की ग्रामीण भागातील प्रदीप कंद आणि संग्राम थोपटे यांच्या नावाचा विचार केला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.