नसरापूर हत्याकांड: राष्ट्रीय महिला आयोगाकडून ‘सु मोटो’ दाखल; खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश!

विशेष प्रतिनिधी

पुणे: जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेची स्वतःहून (सु मोटो) दखल घेतली आहे. आयोगाने या कृत्याचा तीव्र निषेध करत तपास वेगाने करण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर मानले असून, हे केवळ अमानवीय कृत्य नसून बाल हक्कांचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. आयोगाने या संदर्भात खालील महत्त्वाचे पाऊले उचलली आहेत:

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला (NCPCR) या तपासावर प्रत्यक्ष देखरेख ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दोषीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवण्यावर आयोगाचा भर आहे.पीडित कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.



६५ वर्षीय नराधम आरोपीने शुक्रवारी एका ४ वर्षांच्या चिमुरडीला जेवणाचे आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुणे सत्र न्यायालयाने त्याला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची बातमी पसरताच नसरापूर आणि भोर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम होते. आणि अखेर पोलिसांनी बाळाचा वापर करत ॲम्बुलन्सला वाट काढून देत. काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले.

पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती दिली.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना राज्यासाठी लज्जास्पद असल्याचे सांगत, विशेष सरकारी वकील नेमण्याची आणि आरोपीला फाशी मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

Nasrapur Horror: National Commission for Women Takes Su Motu Cognizance; Orders Fast-Track Trial

महत्वाच्या बातम्या