‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र

विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि तिच्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. 1 मे रोजी घडलेल्या या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने तपास यंत्रणेला महत्त्वाचा वेळ मिळाला आहे.

विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने स्वतःचा बचाव करत, किरकोळ भांडणातून आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले प्राथमिक पुरावे, घटनास्थळावरील निष्कर्ष आणि तपासातील महत्त्वाचे धागेदोरे पाहता आरोपीचा हा दावा न्यायालयात टिकू शकला नाही.



या सुनावणीदरम्यान तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात आरोपीच्या पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. त्यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्द्यांनुसार, या गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबींचा तपास अद्याप बाकी असून आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण, मानसिक व शारीरिक सक्षमतेची चाचणी यांसह फॉरेन्सिक तपास करणे आवश्यक आहे. याशिवाय आरोपीचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास तपासणे, घटनास्थळाशी संबंधित पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि या गुन्ह्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
पोलिसांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Accused’s claim of ‘I was lied to’ rejected; Investigation intensified in Nasrapur case

महत्वाच्या बातम्या