इंधनाच्या दरात पुन्हा वाढ; पेट्रोल २.६१ रुपये, डिझेल २.७१ रुपये प्रति लिटरने वाढ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला असून सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी, २५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ जाहीर केली. पेट्रोल प्रति लिटर ₹२.६१ तर डिझेल ₹२.७१ ने महाग झाले आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ₹१०२.१२ तर डिझेलचा दर ₹९५.२० प्रति लिटरवर पोहोचला आहे. मे महिन्यात इंधन दरवाढीची ही चौथी वेळ आहे. Fuel prices

याआधी १५ मे रोजी पेट्रोल-डिझेलमध्ये ₹३ प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी सरासरी ९० पैशांची वाढ, तर २३ मे रोजी पेट्रोल ८७ पैसे आणि डिझेल ९१ पैशांनी महाग करण्यात आले होते. अवघ्या दहा दिवसांत इंधनाच्या दरांमध्ये सात रुपयांहून अधिक वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम अन्नधान्य, भाजीपाला, दूध तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर झपाट्याने वाढले आहेत. युद्धपूर्व काळात ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास असलेले कच्चे तेल आता १०० डॉलरच्या पुढे गेले आहे. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास ९० टक्के कच्चे तेल आयात करत असल्याने या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने आयात खर्चही वाढला आहे.

तेल कंपन्यांवर वाढत्या खर्चाचा दबाव निर्माण झाल्यामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही काळ कंपन्यांनी तोटा सहन करत दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र कच्च्या तेलाच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे अखेर ग्राहकांवरच अतिरिक्त भार टाकावा लागला. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिला आणि क्रूड ऑइलचे दर आणखी वाढले, तर पुढील काही आठवड्यांत पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होऊ शकते.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या अंतिम किंमतीमध्ये केवळ कच्च्या तेलाचा खर्च नसून त्यावर रिफायनिंग खर्च, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि राज्य सरकारांचा व्हॅट यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे ग्राहकांना बेस प्राइसपेक्षा तीन ते चार पट अधिक किंमत मोजावी लागते. प्रत्येक राज्याचा व्हॅट वेगळा असल्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे दिसतात.

Fuel prices soar again; petrol up ₹2.61, diesel ₹2.71 per litre

महत्वाच्या बातम्या