विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Manoj Jarange अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या भेसळविरोधी मोहिमेचे राज्यभरातून कौतुक होत असताना, त्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे हे अत्यंत चांगले आणि प्रामाणिक काम करत असून, त्यांच्या बदलीचा विचार सरकारने अजिबात करू नये. अन्यथा आम्ही सरकारच्या मागे लागू, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला.Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यास मोठी मदत होत आहे. याचा थेट फायदा राज्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याला होणार आहे. तसेच दुधातील भेसळीवर नियंत्रण आल्यास शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शुद्ध दुधाला योग्य भाव मिळेल. त्यामुळे मुंढे यांचे काम हे केवळ प्रशासनापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.Manoj Jarange
आपल्या निडर आणि कठोर प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती ही त्यांच्या कारकिर्दीतील २५ वी बदली ठरली आहे. मात्र, नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच त्यांनी भेसळखोरांविरोधात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू केली आहे. कोट्यवधी रुपयांचा अवैध साठा जप्त करून त्यांनी भेसळीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जात आहे.
मुंढे यांच्या या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, राज्यभरातून त्यांच्या कामाचे स्वागत होत आहे. मात्र, यापूर्वीही विविध ठिकाणी कठोर निर्णयांमुळे त्यांची वारंवार बदली झाल्याचा इतिहास असल्याने, आता पुन्हा एकदा त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जाहीरपणे समर्थन केले आहे. जनहितासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे, असे सांगत त्यांनी मुंढे यांना हटविण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या भवितव्याबाबत आणि सरकारच्या भूमिकेबाबत आता राज्याचे लक्ष लागले आहे.
Don’t transfer Tukaram Mundhe or we’ll take on the government, warns Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या