आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; वाहन परवाना, नोंदणीसह नागरिकांची कामे खोळंबण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यभरातील परिवहन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहन परवाना (Driving Licence), वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट मंजुरी आणि इतर प्रशासकीय कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



गेल्या वर्षभरापासून प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि परिवहन आयुक्तालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचा मार्ग स्वीकारला आहे. विविध आंदोलन, निवेदने आणि बैठका घेऊनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सेवाप्रवेश नियम (Recruitment Rules) नसल्याचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेलाही फटका बसत आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने सेवाप्रवेश नियम आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदांच्या २३ रिक्त जागांवर पदोन्नती देण्यात यावी.
  • कार्यालय अधीक्षक पदासाठी सेवाप्रवेश नियमांबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
  • सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता पदासाठी सेवाप्रवेश नियम तयार करून विधी पदवीधारक कर्मचाऱ्यांना संधी द्यावी.
  • वर्ग ३ संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम निश्चित करण्यात यावेत.
  • लिपिक-टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक पदांची नावे अनुक्रमे “परिवहन सहाय्यक” आणि “वरिष्ठ परिवहन सहाय्यक” अशी बदलण्यात यावीत.
  • वरिष्ठ लिपिक आणि कार्यालय अधीक्षक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे (ACP) प्रलंबित लाभ तात्काळ देण्यात यावेत.
  • संपामुळे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन परवाना नूतनीकरण, नवीन परवाने, वाहन नोंदणी, कर भरणा, परवाने आणि परमिटसंबंधीची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यावसायिक वाहनधारक, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि वाहन खरेदी-विक्री प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • संपाबाबत शासन किंवा परिवहन विभागाकडून अद्याप अधिकृत तोडगा जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र वाढत्या दबावामुळे लवकरच कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Indefinite RTO Staff Strike Begins; Vehicle Licences, Registrations and Public Services Likely to Be Disrupted

महत्वाच्या बातम्या