विशेष प्रतिनिधी
नागपूर : नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात देशभर आंदोलन छेडलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आज नागपुरात दाखल झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात दुपारी ४ वाजता मोठे आंदोलन होणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हे पहिलेच मोठे आंदोलन असल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
जयपूर येथे रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी दीपके यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा कॉलर पकडत थप्पड मारल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर दीपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांवर गंभीर आरोप करत, “सरकार किंवा त्याच्या विचारधारेविरोधात कोणी बोलले की अशा घटना घडतात. यात काही नवीन नाही,” असे वक्तव्य केले.
जयपूरमध्ये नेमके काय घडले?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दीपके यांना खांद्यावर घेतले होते. त्याच वेळी गर्दीतून काही तरुण पुढे येत त्यांच्या कॉलरला धरून थप्पड मारल्याने गोंधळ उडाला. संतप्त कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पकडून मारहाण केली, तर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणात रोहित शर्मा, राकेश गुर्जर, अजय शर्मा, कुलदीप सिंह शेखावत आणि निकेत या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दीपके यांच्या सोशल मीडियावरील विधानांमुळे आणि CJP च्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी असल्याचे सांगितले आहे.
नागपूर आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष
जयपूरमधील घटनेनंतर नागपूरमधील आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार २ हजारांहून अधिक युवक आंदोलनात सहभागी होऊ शकतात.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात ४ डीसीपी,३ एसीपी,१८ पोलिस निरीक्षक,४५ एपीआय व उपनिरीक्षक ४७० पुरुष पोलिस कर्मचारी, १७० महिला पोलिस कर्मचारीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय दोन दंगल नियंत्रण पथके स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, सीजेपीच्या सोशल मीडिया उपस्थितीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील जवळपास २ लाख फॉलोअर्स कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीतील पहिल्या आंदोलनानंतर पक्षाच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली होती, मात्र अलीकडील घडामोडींनंतर त्यात घट झाल्याचे सांगितले जात आहे.
कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटी, सीबीएसई परीक्षांमधील कथित अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी पक्ष देशभरात आंदोलनांची मालिका राबवत आहे.
जयपूरमधील घटनेनंतर दीपके यांनी स्वतःवरील हल्ल्याला “लोकशाहीवरील हल्ला” असे संबोधले. आंदोलनादरम्यान त्यांनी कथित पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले, त्यानंतर वातावरण शांत झाले.जयपूर हल्ल्याचे पडसाद आता नागपुरात उमटत असून, आजचे आंदोलन आणि त्यानंतरची परिस्थिती याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
After Jaipur Assault, Abhijeet Deepke Arrives in Nagpur; Massive Police Deployment for CJP Protest
महत्वाच्या बातम्या