विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vishwas Nangare Patil राज्य सरकारने मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये विशेष चर्चेत असलेले नाव म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.Vishwas Nangare Patil
नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची बदली नांगरे-पाटील यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल झाल्याचे मानले जात आहे.Vishwas Nangare Patil
राज्य सरकारने एकूण १४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, प्रशांत मोहिते यांची छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस उपआयुक्तपदावरून नवी मुंबई येथील डायल ११२ विभागात बदली करण्यात आली आहे. निलेश रोहेन यांची हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदावरून नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाज कुमार यांची पुणे शहर पोलीस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
श्रीमंत लाड यांना खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षकपदावरून हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रुपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून शशिकांत सातव यांची नागपूर शहरातून छत्रपती संभाजीनगर शहरात बदली करण्यात आली आहे. रमेश धुमाळ यांची अमरावती शहरातून नागपूर शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पीयूष जगताप यांची चंद्रपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १७ मधून खामगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. दत्तात्रय शिंदे यांना पदोन्नती देत राज्य गुन्हे अभिलेख विभाग, पुणे येथे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संजय शिंदे यांची मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय संजय वर्मा यांची पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली असून अर्चना त्यागी यांची न्यायिक व तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. नारायण शिरगांवकर यांची गडचिरोली येथून कुरळगाव (अहिल्यानगर) येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ च्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. प्रांजली सोनावणे यांची अमरावती शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या फेरबदलांमुळे नागपूरसह अनेक महत्त्वाच्या पोलीस आस्थापनांमध्ये नव्या नेतृत्वाची नियुक्ती झाली असून आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाच्या दृष्टीने या बदल्यांकडे लक्ष लागले आहे.
Vishwas Nangare Patil entrusted with law and order in CM’s city
महत्वाच्या बातम्या