महापौर रितू तावडे यांच्या पाहणी दौऱ्यातच मुंबईकर ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला; पावसाळी व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत मान्सूनच्या जोरदार पावसाने हजेरी लावताच अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच मोठ्या पावसानंतर शहरातील सखल भाग, रस्ते आणि सबवे जलमय झाल्याने प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विविध भागांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, या पाहणी दौऱ्यादरम्यानच एक धक्कादायक आणि तितकाच विचित्र प्रकार घडला. Ritu Tawde

महापौर रितू तावडे या अधिकाऱ्यांसह तुंबलेल्या पाण्याची पाहणी करत होत्या. प्रशासनाकडून पाण्याचा निचरा कसा केला जात आहे, याची माहिती घेत त्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत होत्या. यावेळी घटनास्थळी माध्यमांचे कॅमेरे आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, फुटपाथलगत असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्याजवळ एक नागरिक आला. त्या ठिकाणी पाणी साचलेले होते आणि महानगरपालिकेकडून सावधानतेचा इशाराही लावण्यात आला होता. मात्र, परिसरात सुरू असलेली लगबग आणि कॅमेऱ्यांची गर्दी पाहून तो नागरिक नेमके काय सुरू आहे हे पाहण्यासाठी पुढे गेला. त्याचे लक्ष इशारा फलकाकडे न गेल्याने तो थेट ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात कोसळला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती कंबरेपर्यंत खड्ड्यात अडकली होती. घटनेनंतर उपस्थित नागरिक, पालिका कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.



या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून मुंबईतील रस्त्यांची अवस्था, उघडी ड्रेनेज व्यवस्था आणि पावसाळी सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा टीका होत आहे.

दरम्यान, अंधेरी सबवेतील पाणी तुंबण्याच्या समस्येवरूनही चर्चा रंगली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी, “सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे केली असली तरी अतिवृष्टीच्या परिस्थितीत अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही,” असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.

मान्सूनच्या सुरुवातीलाच घडलेल्या या प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या पावसाळी नियोजनाची पुन्हा कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai man falls into drainage pit during Mayor Ritu Tawde’s rain inspection visit

 

महत्वाच्या बातम्या