उत्तर हवे की दिखावा करायचाय, कर्जमाफीच्या चर्चेत सत्ताधारी आमदारांमध्येच जुंपली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्जमाफीवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यातच विधान परिषदेत जुंपली. दाेघांनीही एकमेंकांना ओरडू नका म्हणून दरडावले. शेवटी विधान परिषद सभापतींनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केले.

विधान परिषदेच्या सभागृहात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांना प्रश्न केला. तुमच्याकडून उत्तरे आली पाहिजेत, परंतु तुम्ही देत नाही असं दिसून येते असे कडू म्हणाले. त्यावर प्रवीण दरेकरांनी आक्षेप घेतला. आज प्रश्नोत्तरावेळी असेच झाले आणि आता राज्याचे मंत्री सरकारकडून उत्तर देत असताना मध्येच असे थांबवले. त्यामुळे काही प्रथा परंपरा बिघडायला लागल्यात. वारंवार हे सुरू आहे. त्यामुळे यापुढे हे होणार नाही याची दक्षता सभापतींनी घ्यावी अशी मागणी दरेकरांनी केली.



बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात. त्यांचे नेतृत्व करतात मग तुम्हाला उत्तरे पाहिजे की केवळ दिखावा करायचाय. सरकारच्या मंत्र्‍यांचे भाषण सुरू असताना अशाप्रकारे अडथळा आणणे हे बरोबर आहे का? असं संतापून दरेकरांनी विचारले. तेव्हा बच्चू कडू यांनीही मी इथं नवीन आलो नाही असं ओरडून म्हटले तेव्हा दरेकांनी तुम्ही ओरडू नका, तुमच्या दहा पटीने जास्त ओरडतो. तुमच्या स्टाईलने सभागृहाचे कामकाज चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. ज्यांना हुल द्यायची त्यांना द्या असं आक्रमक विधान प्रवीण दरेकरांनी सभागृहात केले.

सभागृहातील वातावरण तापलेले पाहून सभापतींनी या वादावर मध्यस्थी केली. सभागृहाची शिस्त आणि नियम सगळ्या सदस्यांनी पाळणे गरजेचे आहे. एकमेकांना आपसांत प्रश्न प्रतिप्रश्न करणे, मंत्री उत्तर देताना अर्ध्यावरच बोलणे त्यातून काय साध्य होणार आहे? अनेक चर्चेत सदस्य भाग घेतात. ज्येष्ठ मंत्र्यांनी सुरुवात केली आणि लगेच त्यांना प्रतिप्रश्न विचारणे हे बरोबर नाही. सभागृहात काही सदस्य नवीन आहेत त्यामुळे या सभागृहाची जी काही प्रथा परंपरा आहे. कुणीही उठतंय, कुणी वेलमध्ये येतंय तर कुणी क्रॉस करतेय. त्यामुळे मला कारवाईची वेळ येऊ नये म्हणून याची गांभीर्याने दखल घ्यावी असे सभापती राम शिंदे म्हणाले.

Ruling MLAs Clash During Farm Loan Waiver Debate ; Bachhu Kadu

महत्वाच्या बातम्या