नसरापूर चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा आज अंतिम निकाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज जाहीर होणार आहे. हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालय आपला अंतिम फैसला सुनावणार आहे.

केवळ १६ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर पुढील १६ दिवसांत सर्व महत्त्वाच्या साक्षी व पुरावे नोंदवून घेण्यात आले. यानंतर पुढील २० दिवसांमध्ये अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला.



विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सरकारची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात गुन्ह्याचा सविस्तर घटनाक्रम दर्शवणारा टाईमलाईन चार्ट, वैद्यकीय पुराव्यांचे विश्लेषण, फॉरेन्सिक डेटा चार्ट, डीएनए प्रोफाईलिंग मॅट्रिक्स आणि आरोपीचा गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करणारा कनेक्टिव्हिटी चार्ट सादर केला. या भक्कम वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांसोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालांचा संदर्भ देत सविस्तर लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे.

बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला असून दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज २५ जून रोजी न्यायालय दोषीला कोणती कठोर शिक्षा सुनावणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Nasrapur minor rape and murder case: Final verdict today

महत्वाच्या बातम्या