Raghav Chadha ‘आप’मधील अंतर्गत कलह उफाळला? राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यास मज्जाव, उपनेते पदावरूनही उचलबांगडी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील (आप) अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आले असून, राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांना संसदेत बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र पाठवून चड्ढा यांना सभागृह उपनेतेपदावरून हटवत, त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. Raghav Chadha

याच पत्रात चड्ढा यांना सभागृहात बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. पक्षातील मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

राघव चड्ढा यांनी गेल्या काही महिन्यांत संसदेत अनेक महत्त्वाचे आणि चर्चेत असलेले मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी गिग इकॉनॉमीतील कामगारांच्या समस्या, विशेषतः ब्लिंकिटसारख्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या अटी आणि हक्कांबाबत आवाज उठवला होता. याशिवाय, काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार , विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त करप्रणाली, शहरी मध्यमवर्ग आणि नव्या कामगारवर्गाशी संबंधित प्रश्न
असे अनेक विषय त्यांनी मांडले होते. मात्र, पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळे मुद्दे मांडल्यामुळे त्यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा आहे.



गेल्या आठवड्यात ‘आप’ने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही चड्ढा यांना वगळण्यात आले होते. हा निर्णयही पक्षातील अंतर्गत मतभेदांचे संकेत देणारा मानला जात आहे.

चड्ढा यांनी अलीकडील काही महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगल्यामुळेही त्यांची प्रतिमा पक्षात कमकुवत झाली. विशेषतः अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. सोशल मीडियावरही त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही, याची पक्षांतर्गत नोंद घेतली गेल्याचे सांगितले जाते.

२०२५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या पराभवानंतर पक्षामध्ये मोठे बदल झाले. त्यानंतर चड्ढा यांनी स्वतःला पक्षाच्या मुख्य धोरणांपासून काहीसे दूर ठेवले आणि सामाजिक विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले, अशी चर्चा आहे. त्यामुळे नेतृत्वाशी त्यांचे मतभेद वाढल्याचे मानले जाते.

AAP Rift Deepens? Raghav Chadha Barred from Speaking in Rajya Sabha, Removed as Deputy Leader

महत्वाच्या बातम्या