विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून यापेक्षा वेगळी अपेक्षा होती का? असा सवाल केला आहे.
मागील महिन्यात २२ जून रोजी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा केली होती. संबंधित खासदारांनी शिंदे शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर ठाकरे गटाने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.
खासदारांना स्वतःहून विलीनीकरणाचा दावा करता येत नाही आणि तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला होता. मात्र, आता लोकसभा अध्यक्षांनी या सहा खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार म्हणून मान्यता दिली आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर टीका केली. “काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही हाच अन्याय सहन करत आहोत आणि संपूर्ण देश हे पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले, तेच देशासोबत घडत आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे, सहा खासदारांना अधिकृत मान्यता मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. या खासदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला.
“जनतेने निवडून दिलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण होणे आवश्यक आहे. आमच्यासोबत आलेल्या सहा खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित कामांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला जाईल,” असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे शिवसेनेत सहभागी झालेल्या खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, मुंबई उत्तर-पूर्वचे संजय दिना पाटील, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
Aditya Thackeray Slams Recognition of Six UBT MPs as Shinde Sena Members
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका