Prajakt Tanpure : भाजपची विधान परिषद उमेदवारांची पहिली यादी जाहीर; प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी यांना संधी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prajakt Tanpure आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या यादीत राज्यातील ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लखानी यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या यादीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.Prajakt Tanpure

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार खलबते सुरू होती. राज्यातील विविध मतदारसंघांमधून आलेल्या शिफारशींनंतर सुमारे ४८ संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे प्रभारी नितीन नबीन यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अंतिम चर्चेनंतर ११ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.Prajakt Tanpure



भाजपने उमेदवार निवडताना विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांतील प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील राजकीय गणिते, स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि पक्षाची संघटनात्मक क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.

अहिल्यानगर मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देऊन भाजपने या भागात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखाणी यांना संधी देण्यात आली आहे. लखाणी यांचे नाव सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबाशी जोडले जात असल्याने त्यांच्या उमेदवारीची राज्यभरात विशेष चर्चा रंगली आहे. याशिवाय अमरावतीतून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली-सातारामधून धैर्यशील कदम, छत्रपती संभाजीनगर-जालनामधून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन, भंडारा-गोंदियामधून अविनाथ ब्राह्मणकर आणि नागपूर पोटनिवडणुकीसाठी राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता सर्व उमेदवार उद्या आपापल्या मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळू शकते.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून २ जूनला अर्जांची छाननी होणार आहे. ४ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

BJP announces first list of Legislative Council candidates; Prajakt Tanpure, Arun Lakhani get nominations

महत्वाच्या बातम्या