विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ओबीसी हक्कासाठी लढणारे आक्रमक नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता मात्र आज निवडणूक अर्ज प्रक्रियेचा शेवटचा दिवस असताना,या निवडणुकीतून माघार घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महायुतीच्या नेत्यांच्या समंजस बैठकीनंतर हाके यांनी हा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. Laxman Hake
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होत असलेली ही निवडणूक अत्यंत संवेदनशील ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार रिंगणात असताना, ही निवडणूक परंपरेनुसार बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले होते. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी प्रश्नांवरून या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने पेच निर्माण झाला होता. तसेच या निवडणुकीत काँग्रेसनेही आपला उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाल. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दत्तात्रय भरणे आणि लक्ष्मण हाके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संघर्षावर पडदा टाकला. Laxman Hake
“लोकांची सहानुभूती आणि नेत्यांची विनंती”: लक्ष्मण हाके
पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “मी ओबीसींचा नेता म्हणून आणि प्रस्थापित राजकारणाविरोधात एक विद्रोही आवाज म्हणून या निवडणुकीत उतरणार होतो. मात्र, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उदय सामंत आणि दत्तामामा भरणे यांनी मला विनंती केली. खुद्द सुनेत्रा पवार यांचा फोन आल्यानंतर, एका दुःखद प्रसंगामुळे होत असलेल्या या निवडणुकीत थांबणे मला योग्य वाटले. Laxman Hake
हाके यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
“मी माघार घेतली असली तरी ओबीसींच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या मागण्यांवर मी अजूनही समाधानी नाही. १८ महामंडळांची घोषणा झाली, पण अद्याप अध्यक्ष नाहीत, कार्यालय नाही आणि बजेटही नाही.”
“निवडणुकीतून माघार म्हणजे प्रश्नांतून माघार नव्हे. मी माझे प्रश्न आक्रमकपणे मांडतच राहीन.”
दत्तात्रय भरणे यांची मध्यस्थी यशस्वी!
दत्तामामा भरणे यांनी यावेळी हाके यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “राज्याचे नेते अजित दादांचे निधन झाले आहे, अशा वेळी बारामतीची परंपरा जपली जावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. हाके सरांनी मोठ्या मनाने या चांगल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे,” असे भरणे यांनी नमूद केले.
लक्ष्मण हाके यांची माघार हा महायुतीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, हाके यांनी उपस्थित केलेले ओबीसी महामंडळांचे आणि बजेटचे प्रश्न येणाऱ्या काळात सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
या भूमिकेचे संभाव्य परिणाम:
१. भावनिक लाट: अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीत असलेली सहानुभूती सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे.
२. ओबीसी राजकारण: हाके यांनी माघार घेतली असली तरी, त्यांनी दिलेला इशारा आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणासाठी महत्त्वाचा ठरेल.
३. बिनविरोधची शक्यता: इतर लहान उमेदवारांनीही माघार घेतल्यास बारामती पुन्हा एकदा महाराष्ट्राला राजकीय परिपक्वतेचा संदेश देऊ शकते.
लक्ष्मण हाके यांची ही ‘बॅकफूट’वरील खेळी प्रत्यक्षात त्यांना भविष्यात मोठ्या राजकीय भूमिकेसाठी ‘फ्रंटफूट’वर आणणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
Laxman Hake Out of Baramati By-election Even Before the Battle Begins!
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर