पुणे शहरात पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू; जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार!

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरात उद्या (२६ मे) रात्रीपासून पोलिस प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पुणे पोलिसांनी याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून पुढील १४ दिवसांसाठी हे आदेश अमलात राहतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(२)(३) नुसार शहरात पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक (मनाई) आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश दिनांक २६ मे २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून ते दिनांक ८ जून २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

आदेश लागू करण्याचे कारण काय ?

देशभरात इंधन दरवाढीमुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतात.तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही जमाबंदी करण्यात आली आहे.

या जमावबंदीच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, आणि सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच प्रशासकीय खर्च कपातीसाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.
तसेच आगामी बकरी ईद आणि इतर सण-उत्सवांच्या काळात शांतता राहावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.



या’ गोष्टींवर असणार पूर्णपणे बंदी!

आदेशाच्या कालावधीत शस्त्रे ,बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही, कोणतेही दाहक, ज्वलनशील द्रव पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ सोबत घेऊन जाणे.
आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचे चित्र, प्रतीकात्मक प्रेत, पुतळे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल अशा पद्धतीने मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, प्रक्षोभक गाणे किंवा वाद्य वाजवणे,ज्यामुळे सभ्यता, नैतिकता किंवा राज्याच्या सुरक्षेला धोका पोहोचेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव किंवा जनमानसात असंतोष पसरवणाऱ्या गोष्टी तयार व प्रसारित करणे, अशा सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली आहे.

तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यावर बंदी असणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कारवाईचा इशारा!

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अन्वये कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Prohibitory Orders Imposed in Pune City for the Next 14 Days; Find Out What’s Allowed and What’s Banned!

महत्वाच्या बातम्या