विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सक्तवसुली संचालनालयाकडून ( ईडी) चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने काही दिवसांपूर्वीच त्यांची सविस्तर चौकशी केली होती. 70 कोटी रुपयांच्या कथित खंडणी रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने ही चौकशी केली जात आहे.
अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कथित रॅकेटमधून 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पैशांचे व्यवहार लपवण्यासाठी अनेक बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आर्थिक साखळीतील काही धागेदोरे रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या या व्यवहारांशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याची पडताळणी आता ईडीकडून केली जात आहे.
विशेष तपास पथकाने नाशिकमध्ये रूपाली चाकणकर यांची साडेपाच तास चौकशी केली होती. त्या चौकशीदरम्यान विविध आर्थिक व्यवहार, काही संस्थांशी संबंधित कागदपत्रे आणि संपर्कांची माहिती तपास अधिकाऱ्यांनी तपासली होती. एसआयटीच्या चौकशीनंतर लगेचच ईडीने हालचाली वाढवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मनी लाँड्रिंग, आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण यासंदर्भात स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात ‘शिवनिका’ नावाची संस्था देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या संस्थेमधील रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेची तपासणी सुरू आहे. अशोक खरातने कथितरीत्या जमा केलेल्या पैशांचा वापर या संस्थेमार्फत झाला का, तसेच आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी कोणती मदत करण्यात आली का, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय या व्यवहारांचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांपर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Rupali Chakankar at ED office, investigation underway in alleged extortion case of Rs 70 crore
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी