विशेष प्रतिनिधी
पुणे : पतीचे आपल्या कार्यालयातील महिला सेक्रेटरीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या पत्नीने त्याच्या सेक्रेटरीची निर्घृण हत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना चंदननगर परिसरात घडली असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
आरोपी महिलेचे पती संजय सावंत हे भाजपच्या कायदा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांची म्हाडा पॅनलवरही निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून स्वाती संजय सावंत (वय ४२) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पूनम मुन या संजय सावंत या वकिलाच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम या शुक्रवारी रात्रीपासून घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्यांच्या पतीने त्यांचा शोध घेत संबंधित कार्यालय गाठले. कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात येताच त्यांनी आत प्रवेश केला, पूनम या रक्तबंबाळ अवस्थेत मृत स्थितीत पोत्यात आढळून आल्या. या घटनेने घाबरलेल्या पतीने तत्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी स्वाती सावंत हिला तिच्या पतीचे पूनम मुन यांच्यासोबत संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच संतापाच्या भरात स्वाती हिने पूनम यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. गंभीर दुखापतीमुळे पूनम यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून लपवण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
BJP leader’s wife kills secretary over affair suspicion
महत्वाच्या बातम्या