विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश करत, या टोळीच्या मोहरक्याला अटक केली आहे. या कारवाईत ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली एक कार असा एकूण ४७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कामगिरी बजावली.
खेड येथील श्री. मोतीलाल कांतीलाल गदिया यांच्या घरी २ जानेवारी २०२६ रोजी ६८ लाख २ हजार रुपयांची घरफोडी झाली होती. अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या गदिया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके नेमण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात झाली. तपासादरम्यान, उत्तर भारतातील सराईत टोळीचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ही टोळी चारचाकी वाहनांचा वापर करून महाराष्ट्रात घरफोड्या करते आणि पुन्हा उत्तरेकडे पळून जाते.
दिल्ली, उत्तर प्रदेशात सलग सहा दिवस शोध मोहीम राबवून पथकाने आरोपी रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२, रा. दिल्ली) याला मुंबईहून पुण्याकडे येताना पुणे-नाशिक हायवेवर सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी रिझवान याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, पुणे, गुजरात आणि दिल्ली येथेही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
Interstate Burglary Gang Busted; 55 Tolas of Gold and 830 Grams of Silver Seized!
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास