विशेष प्रतिनिधी
पुणे :- शहरातील पाणीकपाती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन दिवस पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. ९ आणि १० जुलै रोजी संपूर्ण पुणे शहरात नियमित पाणीपुरवठा केला जाईल, अशी घोषणा महापौर मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.Water cuts
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहरात दाखल होत आहे. पालखीचा मुक्काम पुण्यात दोन दिवस असणार आहे. या काळात शहरात लाखो वारकरी आणि नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने ९ आणि १० जुलै रोजी पाणीकपात पूर्णपणे रद्द केली आहे. या दोन दिवसांत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
दिवसाआड पाणी पुरवठा का सुरु ?
खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा यंदा लक्षणीय घटला आहे. गेल्या वर्षी जून अखेर धरण क्षेत्रात १२ टीएमसी पाणी शिल्लक होते, जे यंदा केवळ ३.६ टीएमसीवर आले आहे. त्यातच हवामान खात्याने पावसाळा लांबण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. या कपातीमुळे शहरात पाण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पालखी सोहळ्यासाठी ९ ते १० जुलै रोजी पाणी कपात रद्द केली असली, तरी पाण्याची टंचाई कायम असल्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसात पानशेत आणि वरसगाव क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे. तरीही धरणांतील साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत अजूनही कमी आहे.
पुण्याच्या प्रमुख धरणांची टक्केवारी :
खडकवासला १४.९७ %
पानशेत २२.९९ %
वरसगाव १७.६६ %
टेमघर २.३१ %