पुणे मनसेत मोठ्या फेरबदलांचे संकेत; अमित ठाकरेंकडून संघटनात्मक बांधणीचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

विशेष प्रतिनिधी

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिकेत पक्षाला आलेले अपयश आणि सध्याची मरगळलेली संघटनात्मक स्थिती लक्षात घेता, अमित ठाकरे यांनी शहरात पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. पुण्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, लवकरच पुणे मनसेच्या रचनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत दिले आहेत.Amit Thackeray

संघटनात्मक फेरबदलांची गरज

माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, “पुणे शहराच्या एकूणच राजकीय आणि संघटनात्मक बांधणीमध्ये बदल करणे आता काळाची गरज आहे. महापालिकेत आलेले अपयश स्वीकारून, आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेणे आवश्यक आहे.” पक्षाची संघटनात्मक धोरणे अधिक आक्रमक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘आमूलाग्र बदल’ केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:

संपर्क अध्यक्षांची नियुक्ती-राज ठाकरे यांनी पक्षाच्या बळकटीकरणासाठी सर्वच ठिकाणी संपर्क अध्यक्ष नेमले आहेत, जेणेकरून कामात सुसूत्रता येईल.

वन-टू-वन’ संवाद:केवळ गटात न चर्चा करता, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला वैयक्तिकरीत्या (1 to 1) भेटून त्यांचे मत जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
उणिवांचा शोध: पक्ष नेमका कुठे कमी पडत आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.



राज ठाकरेंना अहवाल सादर करणार

पुणे दौऱ्यातील सर्व निरीक्षणे आणि कार्यकर्त्यांच्या भावना यांचा एक सविस्तर अहवाल तयार करून तो लवकरच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाईल.

पुणे शहरानंतर आता २५ आणि २६ तारखेला अमित ठाकरे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांशिवाय इतर सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचीही ते भेट घेणार आहेत, जेणेकरून शहराच्या प्रश्नांची व्यापक जाण करून घेता येईल.

पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता की नवी ऊर्जा?

अमित ठाकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे मनसेतील अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परफॉर्मन्स न दाखवू शकणाऱ्या नेत्यांना डच्चू देऊन नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, अमित ठाकरेंचा हा दौरा केवळ औपचारिकता नसून पुणे मनसेला पुनरुज्जीवित करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. आता या दौऱ्यानंतर सादर होणाऱ्या अहवालावर राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Amit Thackeray Prepares ‘Action Plan’ for Organizational Rebuilding

महत्वाच्या बातम्या