नाशिक टी सी एस प्रकरण : आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत मानसिक, शारीरिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी ‘कॉर्पोरेट’ अत्याचार सहन केला. वडिलांची किमोथेरपी आणि औषधांच्या पैशांची गरज असल्याने वरिष्ठांकडून होणारा
मानसिक, लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव आणि अपमान निमूटपणे सोसला, अशी कैफियत एका पीडित तरुणीने राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकासमोर मांडली.

नाशिकमधील टीसीएस या नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने ( Commission for Women (NCW) स्वतः लक्ष घालत सखोल चौकशी सुरू केली असून, तपासाच्या दरम्यान समोर येणारी माहिती अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी आहे.

तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, काही महिला कर्मचाऱ्यांनी आयोगासमोर दिलेल्या जबाबांतून कॉर्पोरेट वातावरणातील भीती, दबाव आणि शोषणाचे गंभीर चित्र समोर आले आहे.एका पीडित तरुणीने सांगितले की, तिच्या वडिलांना कॅन्सरसारखा गंभीर आजार असून त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता. कुटुंबाचा एकमेव आधार असल्यामुळे तिला नोकरी गमावण्याची भीती होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत वरिष्ठांकडून तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. अपमानास्पद वागणूक, दबाव आणि कामाच्या नावाखाली अतिरिक्त छळ सहन करावा लागल्याचे तिने नमूद केले.

दुसऱ्या एका पीडितेने आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, नोकरी टिकवण्यासाठी तिला धर्मांतराच्या दबावाला सामोरे जावे लागले. कुटुंबाची जबाबदारी, वडिलांचे आजारपण आणि आर्थिक अडचणी यामुळे तिने हा दबाव सहन केल्याचे तिचे म्हणणे आहे. “घर चालवण्यासाठी आणि वडिलांच्या उपचारांसाठी मला गप्प राहावे लागले,” अशी व्यथा तिने आयोगासमोर मांडली.

तपास पथकाची प्रत्यक्ष पाहणी

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाच्या पथकाने संबंधित आयटी कंपनीच्या नाशिक येथील कार्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत कार्यालयातील विविध विभाग, कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था, महिला सुरक्षेच्या उपाययोजना, तसेच कॅन्टीन आणि वेटिंग एरियामधील सीसीटीव्ही यंत्रणा यांची तपासणी करण्यात आली.

पथकाने काही महिला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी आणि अनुभव जाणून घेतले. या संवादादरम्यान अनेकांनी भीतीच्या वातावरणात काम करावे लागत असल्याचे सूचित केले, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महिला आयोगाकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू असून, आणखी काही महिला पुढे येऊन जबाब देण्याची शक्यता आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात डिजिटल पुरावे, ईमेल संवाद, आणि सीसीटीव्ही फुटेज यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

Nashik Tata Consultancy Services case

महत्वाच्या बातम्या